Saturday, April 18, 2026
HomeEducationविज्ञानाला कलात्मकतेची जोड द्या व व्यावहारिक बना – फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल...

विज्ञानाला कलात्मकतेची जोड द्या व व्यावहारिक बना – फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान-कला प्रदर्शनातून समाजप्रबोधनाचा संदेश

पडळ प्रतिनिधी | 

कळे (ता. पन्हाळा) येथील फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन व मार्केट डे (आठवडी बाजार) या उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पंचक्रोशीतील पालक, नागरिक, विद्यार्थी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष श्रीपतराव देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी चेअरमन सचिन देसाई, उपाध्यक्ष डॉ. रुपाली देसाई, प्राचार्या मेघा देसाई, सारिका नाईक, दीपक पवार, सरदार भोसले, सौ. क्रांती बच्चे, रवींद्र कोठारी, जनराज देसाई, राम देसाई, सागर पाटील तसेच प्रा. नंदकुमार बुरान आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित शास्त्रीय उपकरणे व मॉडेल्स सादर केली. त्यामध्ये शेती संवर्धन, पाणी संवर्धन, भूकंप, ज्वालामुखी, 3D मॉडेल्स, प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धन अशा महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी मांडणी करण्यात आली होती. या मॉडेल्समधून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची व्यावहारिक बाजू उत्तम प्रकारे सादर केली.

कला प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली आकर्षक चित्रे, कोलाज, कलात्मक आकार, हस्तकला वस्तू पाहून उपस्थित पालक व नागरिक भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला या प्रदर्शनातून उत्तम व्यासपीठ मिळाले.

तसेच मार्केट डे उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल ९० स्टॉल्स उभारून विविध खाद्यपदार्थ व वस्तूंची विक्री केली. यामध्ये ताक, दही, लस्सी, वडा-पाव, आईस्क्रीम, चॉकलेट, कापडी पिशव्या तसेच भाजीपाला अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स आकर्षणाचे केंद्र ठरले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, व्यवहारकौशल्ये, गणिती व्यवहार आणि संवाद कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

यावेळी बोलताना चेअरमन सचिन देसाई म्हणाले, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. विज्ञान, कला आणि व्यावहारिक शिक्षण यांची सांगड घातल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होतात. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जात आहेत.”

संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. रुपाली देसाई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी महत्त्वाची संधी असते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनण्याची व आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देण्याची संधी मिळते. तसेच कला व हस्तकला प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना चौकटीबाहेर विचार करण्याची प्रेरणा मिळते. मार्केट डे सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, व्यवहारकौशल्ये आणि संवाद कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.”

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळाला असून शाळेच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची प्रभावी झलक पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थित पालक व नागरिकांनी व्यक्त केली

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular