कोल्हापूर : जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तब्बल १५ वकिलांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ७ मार्च रोजी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास न्यायालयाच्या तळमजल्यावरील झेरॉक्स सेंटर परिसरात घडली. अश्विनी उर्फ पल्लवी निखिल पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अश्विनी पाटील यांनी पतीविरोधात घटस्फोटाचा दावा दाखल केला असून, त्या सुनावणीसाठी न्यायालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पतीकडे काही घरगुती साहित्याची मागणी केली असता दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
तक्रारीनुसार, अॅड. काजल शेळके यांनी अश्विनी पाटील यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या गालातून रक्तस्राव झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी उपस्थित इतर वकिलांनीही फिर्यादीला धमकावत जातीवाचक अपमान केल्याचा आरोप आहे. याशिवाय, तिला जबरदस्तीने बाहेर काढण्याचा आणि तिच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अॅड. काजल शेळके, अॅड. मनिषा सातपुते, अॅड. साक्षी निकम, अॅड. हर्षा खंडेलवाल, अॅड. संदीप चौगुले, अॅड. व्ही.आर. पाटील, अॅड. संदीप देशपांडे, अॅड. नारायण भांदिगरे, अॅड. विवेक घाटगे, अॅड. सुरज भोसले, अॅड. स्वाती तानवडे, अॅड. तृप्ती किनरे, अॅड. विद्या देशमुख, अॅड. जे.जे. देसाई आणि अॅड. शिल्पा सुतार यांच्यासह एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलिस करत असून, न्यायालय परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.