कळे : मरळी पैकी पोवारवाडी (ता. पन्हाळा) येथील शेतकरी बंडा दादू पोवार यांच्या शेतातील विहीर अचानक गडप झाली. या घटनेत विहिरीचे बांधकाम व विद्युत पंप मिळून अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
कागद कारखाना परिसरात पोवार यांचे शेत असून सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी शेतीसाठी पस्तीस फूट खोल विहीर बांधली होती. जमिनीपासून पंधरा फूट खोल दगडी पाया लागत असल्याने त्या भागापासून वर वीट व काँक्रिटमध्ये पक्के बांधकाम करण्यात आले होते. या विहिरीवर पोवार व त्यांच्या भावकीची मिळून साडेतीन एकर शेती अवलंबून होती. त्यामुळे ते नियमित डागडुजी व निगा राखत असत.
दरम्यान, काही अंतरावर कोल्हापूर–गगनबावडा मार्गालगत प्रदीप कुंभार (काटेभोगाव) यांचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. त्यांनी आपल्या व्यवसायासाठी या विहिरीतून विद्युत पंपाद्वारे पाणी नेले होते. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्याने ते विहिरीकडे गेले असता विहिरीचे संपूर्ण बांधकाम व पंप गडप झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेमुळे शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक व सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अचानक विहीर कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाने पंचनामा करून तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.