पन्हाळा प्रतिनिधी : पन्हाळा–कोल्हापूर महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पट्ट्या मुख्य रस्त्यापेक्षा सुमारे सहा इंच खाली असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वाहनांना साईड देताना किंवा रस्त्यावरून खाली उतरवून पुन्हा वर घेताना पट्ट्यांचा अचूक अंदाज न आल्याने विशेषतः दुचाकी चालकांना मोठा धोका निर्माण होत आहे.
छत्रपती शिवाजी पुल ते वाघबीळ या दरम्यान नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्ता आणि बाजू पट्ट्यांमध्ये समपातळी नसल्याने लहान वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहनधारकांनी संबंधित विभागाने तातडीने रस्ता व बाजू पट्ट्या समपातळीवर कराव्यात, अशी मागणी केली आहे.
या मार्गावर पन्हाळगड आणि जोतिबा मंदिर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटक व भाविकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीचा ताण अधिक असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या छोट्या खाद्यगाड्या व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली असली तरी धोकादायक बाजू पट्ट्यांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
मुख्य रस्त्यावरून विविध गावांकडे जाणाऱ्या मार्गांवर दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. परिणामी वाहनचालकांना योग्य वळण वेळेत लक्षात येत नाही. तसेच काही ठिकाणी गटारी अरुंद व उघड्या आहेत. वडणगे फाटा आणि आंबेवाडी परिसरातील मोरीजवळ अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंबेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले असून अधूनमधून तो कचरा जाळला जातो. त्यामुळे रस्त्यावर धुराचे लोट पसरून दृश्यमानता कमी होते आणि अपघाताचा धोका वाढतो. हॉटेल व्यावसायिकांनी टाकलेल्या उघड्या कचऱ्यावर भटक्या कुत्र्यांची वर्दळ असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
या सर्व समस्यांमुळे वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याच्या बाजू पट्ट्या समपातळीवर आणून, दिशादर्शक फलक बसवून व धोकादायक ठिकाणी योग्य ती उपाययोजना करून अपघाताचे प्रमाण कमी करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.