नाशिक:
नाशिकमध्ये अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
अशोक खरात हा अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटींमध्ये परिचित होता. अनेकजण त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, खरातच्या ‘शिवनिका संस्थान ट्रस्ट’ या संस्थेशी रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्या या ट्रस्टच्या विश्वस्त असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, सोशल मीडियावर चाकणकर या खरातचे पाद्यपूजन करतानाचा व्हिडिओ तसेच त्याच्यासाठी छत्री धरतानाचे फोटो व्हायरल झाल्याने वाद अधिकच चिघळला आहे.
सोशल मीडियावर टीका वाढत असताना रुपाली चाकणकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून विविध सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही त्याच्याशी जोडले गेलो होतो. या ट्रस्टमध्ये समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी आहेत.”
तसेच, “कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा त्यांच्यावर असलेल्या आरोपांबाबत मला कोणतीही माहिती नव्हती. आता समोर आलेल्या आरोपांची पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.