कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले गावात आर्थिक व्यवहाराच्या वादातून मारहाणीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल सात्ताप्पा पाटील (वय 46, रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) यांनी आरोपींकडे सुपर मार्केट सुरू करण्यासाठी सुमारे 40 लाख रुपये दिले होते. मात्र संबंधितांनी व्यवसाय सुरू करून न दिल्याने व पैसे परत न केल्याने फिर्यादी 15 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोर्ले येथे पैसे मागण्यासाठी गेले होते.
यावेळी आरोपी विकास जयसिंग खुडे याच्याशी पैशांबाबत विचारणा केली असता त्याने उलट शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. त्यानंतर जयसिंग खुडे यांनी काठीने फिर्यादीच्या पाठीत व पायावर मारहाण केली. घटनेदरम्यान फिर्यादीचा मित्र पांडुरंग पाटील सोडवणूक करण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.
तसेच मनजित खुडे याने काठीने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या घोट्याजवळ मारून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी विद्या खुडे हिने शिवीगाळ करून पुन्हा येथे आल्यास अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून काठीचा वापर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.59 वाजता गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून पुढील कार्यवाही सुरू आहे.