पन्हाळा प्रतिनिधी – (शहाबाज मुजावर)
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारीच मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल (रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास) गडावरी येथील एका रुग्णाला अचानक चक्कर आल्याने त्याचे नातेवाईक तातडीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले. मात्र, त्यावेळी कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर टोणपे हे मद्यधुंद अवस्थेत होते. इतकेच नव्हे, तर त्यांना व्यवस्थित बोलता किंवा चालताही येत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या परिस्थितीत रुग्णावर प्राथमिक उपचार नर्सिंग स्टाफने केले. मात्र, पुढील उपचारासाठी रुग्णाला तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे कोल्हापूर येथे हलवण्यात आले.
दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा व्हिडिओ चित्रीत केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, नुकतेच कागल येथून बदली होऊन आलेले डॉ. टोणपे यांनी अशा प्रकारे कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत, “अशा मद्यधुंद अधिकाऱ्यांच्या हवाली रुग्णांचा जीव सोपवायचा का?” असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
कारवाईचे संकेत
याबाबत पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील अभियंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “अशा प्रकाराला अजिबात सहन केले जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाला तत्काळ कळवण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाची शिफारसही करण्यात आली आहे.”
या प्रकारामुळे पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.