Friday, April 17, 2026
HomeCrimeभुयेवाडी (ता. करवीर) येथे बिबट्याचा हल्ला; शेळी ठार, मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण

भुयेवाडी (ता. करवीर) येथे बिबट्याचा हल्ला; शेळी ठार, मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण

भुयेवाडी: 

भुयेवाडी (ता. करवीर) परिसरात काल दि. 12 रोजी (शुक्रवारी ) रात्री बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, यामुळे परिसरातील शेतकरी व मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगराकडील यशवंत पाटील यांच्या शेतामध्ये मेंढ्या बसवण्यासाठी आलेले मेंढपाळ रघुनाथ पांडुरंग हजारे हे आपल्या कळपासह वास्तव्यास होते.

रात्री अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज सुरू झाला. त्यावेळी बिबट्याने कळपावर हल्ला करत एक शेळी ठार केली. त्यानंतर दुसऱ्या शेळीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, घाबरलेल्या मेंढ्या, शेळ्या व बोकडांनी पळ काढला. हल्ल्यानंतर बिबट्या डोंगर कपारीत निघून गेला.

या घटनेमुळे रघुनाथ हजारे यांनी संपूर्ण रात्र भीतीच्या छायेखाली काढली. सकाळी ही माहिती कृष्णात हजारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिकांशी चर्चा करून वनविभागाला कळवले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून परतले.

दरम्यान, या घटनेमुळे भुयेवाडी व आसपासच्या भागात बिबट्या, रानडुकरे व इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतवस्त्यांवर जाण्यास नागरिक धजावत नाहीत. त्यामुळे संबंधित मेंढपाळाला योग्य नुकसानभरपाई देऊन न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular