कोल्हापूर : शिरोली एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधून कार्बाईड इन्सर्ट्स व इतर औद्योगिक साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २५ लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
शिरोली येथील स्काय टेक्नोव्हिजन व एस. व्ही. इंजिनिअरिंग सोल्युशन या कंपन्यांच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कार्बाईड इन्सर्ट्स, टूल्स, डीव्हीआर आणि वाय-फाय उपकरणे चोरी केली होती. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६९/२०२६ नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान आरोपी चोरीचा माल विक्रीसाठी महिंद्रा जीतो स्ट्राँग (एमएच ५१ सी १८११) या वाहनातून किणी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार १६ जून रोजी सापळा रचून विजय विलास गोसावी (वय २९) आणि राहुल शिवाजी गोसावी (वय ३४, दोघेही रुकडीवाडी, ता. हातकणंगले) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी साथीदारांच्या मदतीने विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे कार्बाईड इन्सर्ट्स, ड्रिल्स, एंडमिल, मोबाईल हँडसेट आणि चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण २५,३६,७२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उघडकीस आलेले गुन्हे
-
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. १६९/२०२६ : ११.५४ लाख रुपयांचे २,६९८ कार्बाईड इन्सर्ट्स.
-
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. १६६/२०२६ : ४.५८ लाख रुपयांचे १,२८० कार्बाईड इन्सर्ट्स तसेच ड्रिल्स व एंडमिल.
-
गांधीनगर पोलीस ठाणे गु.र.नं. २३५/२०२६ : ४.०३ लाख रुपयांचे ६५५ कार्बाईड इन्सर्ट्स.

