Wednesday, June 17, 2026
HomePoliticalठाकरे गटातील सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता; शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

ठाकरे गटातील सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता; शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

 मुंबई : राज्याच्या राजकारणात मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींना बुधवारी मोठे वळण मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील नऊपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर त्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कथित ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संबंधित सहा खासदारांनी दिल्लीत एकत्र येत स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र सादर करून नव्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली होती. लोकसभा अध्यक्षांनी या गटाला मान्यता दिल्यानंतर हा गट शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा आहे.

या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तातडीने लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. गटाला मान्यता देण्यापूर्वी ठाकरे गटाची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती करण्याची त्यांची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.

पक्षांतरबंदी कायद्यानुसार स्वतंत्र गटाला मान्यता मिळण्यासाठी संबंधित पक्षाच्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण नऊ खासदार असून त्यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यामुळे आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे.

मान्यता मिळालेल्या गटातील खासदार

स्वतंत्र गटात सहभागी झालेल्या खासदारांमध्ये संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) आणि संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई) यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत संबंधित पक्षांकडून अधिकृत भूमिका आणि पुढील घटनाक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular