Sunday, May 17, 2026
HomeAgricultureशक्तिपीठ महामार्गास आमचा विरोध कायम ; राजु शेट्टी

शक्तिपीठ महामार्गास आमचा विरोध कायम ; राजु शेट्टी

माढा ( प्रतिनिधी) 

      राज्यातील १३ जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग हा पालखी महामार्ग व पुणे – सोलापूर महामार्गास समांतर असल्याने शेतकऱ्यांचा या महामार्गास विरोध असून एक इंचही जमीन न देण्याचा संकल्प राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोकोच्या आंदोलनादरम्यान केला.

         राज्यातून सर्वच भागातून शक्तिपीठ महामार्गास कडाडून विरोध होत असून रास्ता रोको , मोर्चे , उपोषणे , धरणे आंदोलन यासारखी आंदोलने करून शेतकऱ्यांनी आंदोलनाची धग कायम ठेवली आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील अरण या गावी पुणे -सोलापूर महामार्ग रास्ता रोको करून बंद ठेवण्यात आला. माढा तालुक्यातून सर्वाधिक द्राक्ष, ऊस व डाळींब बागायती जमीनी यासाठी संपादित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांनी उजनी डाव्या कालव्यातून १० ते १२ किलोमीटर पाईपलाईन करून जमीनी बागायती केलेल्या आहेत. 

           संत सावता माळी यांची संजीवन समाधी असलेल्या गावात कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी” हा त्यांचा जगप्रसिद्ध अभंग याच अरण गावच्या मातीतील शेतामळ्यात रचला गेला. दरवर्षी आषाढी वारी झाल्यानंतर स्वतः विठ्ठलाची पालखी सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूरहून अरण गावी येते. याच गावातून शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने व ६०० एकर जमीन यासाठी संपादित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी या मार्गास विरोध केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील गावांमधून लढा तीव्र होत असून शेतकरी संघटित झाला आहे. 

      दरम्यान शेतकऱ्यांनी महामार्ग रोखल्यानंतर पंधरा मिनीटांतच पोलिसांनी शेतकऱ्यांना महामार्गावरून अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजू शेट्टी यांनी संतप्त होवून पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. पोलिसांनी दडपशाही केल्यास राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत बसण्याचा इशारा दिला.यानंतर पोलिसांनी सयंमाची भुमिका घेतल्याने सर्व मान्यवरांची मनोगते होवूपर्यंत जवळपास १ तास रास्ता रोको झाला. 

   यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सचिन पाटील, तानाजी बागल, शिवाजी पाटील, अजित बोरकर, सिद्वेश्वर घुगे,शाहाजन शेख, विजय शिंदे, सोमनाथ शिंदे, प्रशांत पाटील, प्रताप पिसाळ, बापूसाहेब गायकवाड, चंद्रकांत कुटे, प्रताप देशमुख , मगण काळे यांच्यासह परिसरातील शक्तीपीठ बाधित शेतकरी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular