कोल्हापूर / दोनवडे (श्रीकांत पाटील) :
महायुती सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सत्तेवर नसताना सातबारा कोरा करु आणि सत्तेवर आल्यानंतर घुमजाव केले आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. आता दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार अशी घोषणा केली आहे. पण याआधी काँग्रेस सरकारने कर्जमाफी केली त्या सरकारने कर्जमाफीसाठी कोणतेही निकष ठेवले नव्हते. महायुती सरकारने शेतकऱ्यांना अक्षरशः गंडवले आहे.
महापूर, कोरोना आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी पिचला गेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे आकडे वाढतच चालले आहेत. सरकारने आमचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. आता फक्त दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली जात आहे. मग आमचा सातबारा कोरा नेमका कधी होणार?” असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
रत्नापूर येथील शेतकरी अंगत टेकाळे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “उद्योजकांची मोठमोठी कर्जे माफ केली जातात; मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना सरकार हात आखडता घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.”

