कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या २०२६ मधील निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले असून, या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी ‘राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ या नव्या पॅनेलची घोषणा करत निवडणुकीच्या आखाड्यात अधिकृतपणे उडी घेतली आहे. या घोषणेमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून आमदार सतेज पाटील यांनी दूध उत्पादक सभासद आणि शेतकऱ्यांना थेट साद घालत, गोकुळ ही केवळ दूध संस्था नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्याची आर्थिक घडी ऊस, दूध आणि उद्योगांवर आधारित असून, ग्रामीण विकासात गोकुळ संघाने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गोकुळ संघामार्फत सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना दर दहा दिवसांनी जवळपास ८० कोटी रुपयांचे दूध बिल अदा केले जाते. त्यामुळे एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीच्या संस्थेत पक्षीय राजकारणापेक्षा शेतकरी हिताला प्राधान्य देणारे, सुसंस्कृत आणि पारदर्शक नेतृत्व आवश्यक असल्याचे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले. तसेच, गेल्या पाच वर्षांत संस्थेच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न केल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर गोकुळ निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत Hasan Mushrif आणि सतेज पाटील यांनी एकत्र येत महाडिक गटाची तब्बल २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली होती. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत हसन मुश्रीफ महायुतीसोबत असून, सतेज पाटील महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही नेत्यांची भूमिका काय राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
गोकुळची निवडणूक ही केवळ एका सहकारी संस्थेची निवडणूक नसून, ती जिल्ह्याच्या अर्थकारणाशी निगडित असल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. पारदर्शक कारभार, शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि संस्थेचा विकास हीच राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीची प्रमुख भूमिका असेल, असे संकेत या घोषणेतून मिळत आहेत.