Wednesday, May 27, 2026
HomePoliticalराष्ट्रवादीतील वाद संपला; गोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार – मंत्री हसन मुश्रीफ

राष्ट्रवादीतील वाद संपला; गोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आता संपुष्टात आला असून पक्ष उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रावहिनी पवार यांच्या पाठीशी एकसंघपणे उभा आहे, असा दावा राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. आज बुधवारी (दि. २७ मे) सकाळी कोल्हापूर विमानतळावर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलीकडील कार्यकारिणी बैठकीत पक्षातील सर्व नेते, खासदार आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. पक्षातील मतभेद हे “पेल्यातील वादळ” असून ते संपल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, बैठकीला अनुपस्थित असलेले प्रफुल पटेल हे अन्य कामानिमित्त गैरहजर होते, असेही त्यांनी नमूद केले.

अजितदादा पवार यांच्या निधनानंतर काही नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, सुनेत्रावहिनी पवार यांच्या शपथविधीनंतर काही माध्यमांतून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे काही भावना व्यक्त झाल्या असल्या तरी पक्ष एकसंघ असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

राज्यातील खातेवाटपावर बोलताना त्यांनी सांगितले की, अर्थ खाते राष्ट्रवादीकडे होते; मात्र अद्याप ते मिळालेले नाही. याबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले.

गोकुळ निवडणूक महायुतीनेच लढविणार

गोकुळ निवडणुकीवर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढविली जाईल आणि चेअरमनही महायुतीचाच असेल. उमेदवारीसाठी ठरावांच्या जुळणीवरून कोणतीही ठिणगी पडलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व ठराव पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

आमदार सतेज पाटील यांनी स्थापन केलेल्या “राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडी”बाबत विचारले असता, “त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्ही महायुतीने काय करावे हा आमचा प्रश्न आहे,” असे सांगत महायुती गोकुळ निवडणूक एकत्र लढविणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या सदस्यांच्या कच्च्या व पक्क्या मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. संस्थांकडून प्रतिनिधी अधिकृत केल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पुढे जाईल. साधारण सप्टेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

सीपीआर वादावर अधिकाऱ्यांना संयमाचा सल्ला

छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या केबिन वादावर बोलताना मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. सीपीआरच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असून त्यानंतर पालकमंत्री व प्रशासनाच्या बैठकीत तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी आणि साखर उद्योगाच्या प्रश्नांसाठी दिल्ली दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना मुश्रीफ यांनी सांगितले की, कांद्याचे पडलेले दर आणि साखर उद्योगातील गंभीर अडचणी या दोन प्रमुख मुद्द्यांवर केंद्र सरकारशी चर्चा होणार आहे.

साखरेचे दर वाढविणे, इथेनॉलचे दर व उचल वाढविणे, को-जनरेशनचे दर वाढविणे, सॉफ्ट लोन, कर्ज पुनर्रचना आणि व्याजाचा भार केंद्र सरकारने उचलण्याबाबत चर्चा होईल. केंद्र सरकार या संकटातून मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular