भिवंडी : प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचे परिणाम आता भिवंडीत दिसून येऊ लागले आहेत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदा गुटखा व्यवसायाविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे राज्यातील गुटखा पुरवठ्याचे महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या भिवंडीत व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पानटपऱ्यांवर ग्राहकांनी गुटखा किंवा पान मसाला मागू नये, असे फलक झळकू लागले आहेत.
महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित पान मसाल्यावर बंदी असतानाही अनेक वर्षांपासून त्याचा बेकायदा व्यापार सुरू असल्याचे समोर येत आहे. FDA कडून अलीकडे उत्पादन, वाहतूक, साठवण आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.
भिवंडी हे शहर यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिद्ध असले तरी गोदामे आणि लॉजिस्टिक नेटवर्कसाठीही महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे गुटख्याच्या साठवणुकीसाठी आणि राज्यभर पुरवठ्यासाठी या शहराचा वापर होत असल्याचा संशय यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त होऊनही कारवाई बहुतेक वेळा चालक, वाहतूकदार किंवा खालच्या स्तरावरील व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहत होती. मात्र तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यावर भर दिल्याची चर्चा असून त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित अनेकांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. काही व्यावसायिकांनी व्यवहार कमी केल्याचीही माहिती समोर येत आहे.
या कारवाईचा परिणाम आता प्रत्यक्षात दिसून येत असून भिवंडीतील अनेक पानटपऱ्यांवर “कृपया गुटखा किंवा पान मसाला मागू नका” असे इशाऱ्याचे फलक लावण्यात आले आहेत. दुकानदारांकडूनही ग्राहकांना अशा उत्पादनांची मागणी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिक आणि तंबाखूविरोधी कार्यकर्त्यांनी FDA च्या या मोहिमेचे स्वागत केले असून बेकायदा गुटखा व्यापारावर कायमस्वरूपी आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. FDA ची कारवाई याच वेगाने सुरू राहिल्यास भिवंडीतील गुटखा पुरवठा साखळीला मोठा फटका बसू शकतो, असे मतही व्यक्त होत आहे.