प्रतिनिधी : पन्हाळा
घोडागाडी शर्यत ही केवळ स्पर्धा नसून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन, ग्रामीण परंपरा आणि घोड्यांच्या संगोपनाशी जोडलेली जीवनशैली असल्याचे मत घोडेमालक आणि संबंधित घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घोडागाडी शर्यतीवरील बंदीनंतर या व्यवसायाशी संबंधित हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावल्याचा दावा करण्यात येत आहे.
पिढ्यानपिढ्या घोडे पाळणे, त्यांचे प्रशिक्षण आणि शर्यतींमध्ये सहभाग हा अनेकांचा मुख्य व्यवसाय राहिला आहे. विशेषतः धनगर समाजातील काही कुटुंबे शेळी-मेंढ्यांसोबत घोड्यांची पैदास करत असून शर्यती आणि घोडाप्रेमींमुळे या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध होत होती. मात्र शर्यती बंद झाल्यानंतर घोड्यांची मागणी कमी झाली असून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे.
घोडागाडी, घोड्यांचा सांभाळ, खाद्य, औषधोपचार, निवारा आणि प्रशिक्षण यासाठी मालकांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. मात्र व्यवसाय बंद झाल्याने अनेक मालक कर्जाच्या ओझ्याखाली दबले असून घोड्यांचा सांभाळ करणेही आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे.
घोडेमालकांचे म्हणणे आहे की, घोड्यांवर प्रेम करून त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळले जाते. काही अपवादात्मक घटनांच्या आधारे संपूर्ण व्यवसायावर बंदी आणणे योग्य नसून घोड्यांच्या आरोग्य व संरक्षणासाठी कठोर नियमावली लागू करावी. पशुवैद्यकीय तपासणी सक्तीची करावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने शर्यतींना परवानगी द्यावी.
तसेच तामिळनाडूमधील जल्लीकट्टू खेळाप्रमाणे महाराष्ट्रातही घोडागाडी शर्यतीसाठी विशेष कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शर्यतीचे घोडे सांभाळणे अशक्य होत असल्याने शासनाने तालुकास्तरावर घोडे संगोपन केंद्र सुरू करावे किंवा घोडेमालकांना आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी संबंधितांकडून करण्यात आली आहे.