Tuesday, June 16, 2026
HomeAdministrationखुपीरे ग्रामीण रुग्णालयात सहा लाखांच्या निधीतील गैरव्यवहार; आरोग्य उपसंचालकांच्या तपासणीत प्रकार...

खुपीरे ग्रामीण रुग्णालयात सहा लाखांच्या निधीतील गैरव्यवहार; आरोग्य उपसंचालकांच्या तपासणीत प्रकार उघड

कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील खुपीरे येथील ग्रामीण रुग्णालयात किरकोळ दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे सहा लाख रुपयांच्या निधीमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी अचानक केलेल्या तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण रुग्णालयातील खिडक्यांचे गज दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी उपसंचालक कार्यालयाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत संबंधित कामे झालेली नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा केला जात आहे.

शुक्रवारी दुपारी डॉ. माने यांनी खुपीरे ग्रामीण रुग्णालयाची अचानक तपासणी केली. यावेळी निधीतून करण्यात येणाऱ्या कामांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. सुरुवातीला समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांनी खर्चाची फाईल मागवून तपासणी केली. तपासणीत कामे पूर्ण न होता ठेकेदाराला रक्कम अदा करण्यात आल्याची बाब समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी संबंधित फाईल सोमवारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, रुग्णालयातील वाढीव बांधकाम, विद्युत कामे आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामांमध्येही गैरव्यवहार झाल्याची चर्चा  सुरू असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्ष काम न झाल्याचे उपसंचालकांच्या निदर्शनास आले .

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular