कोल्हापूर, प्रतिनिधी : करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या जीपवर कारवाई करत चालकास ताब्यात घेतले. या कारवाईत विदेशी दारू, जीप व मोबाईल असा एकूण ८ लाख ७७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, GA-03-Y-1363 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या जीपमधून गोवा बनावटीची विदेशी दारू गारगोटी-कोल्हापूर मार्गे शहरात आणली जाणार आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील कळंबा नाका परिसरात सुरभी हॉटेलसमोर सापळा रचला. संशयित जीप दिसताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. चालकाने आपले नाव गजानन दिनकर पाटील (वय ४९, रा. कोल्हापूर) असे सांगितले.
जीपची डिक्की तपासली असता त्यामध्ये खाकी व पांढऱ्या रंगाच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली. काही बॉक्स उघडून पाहिले असता त्यात ७५० मि.ली. व १८० मि.ली.च्या काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या असल्याचे स्पष्ट झाले. चालकाकडे दारू बाळगण्याचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. चौकशीत त्याने हा माल गोव्यातून आणून कोल्हापुरात विक्रीसाठी आणत असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी १ लाख ६९ हजार २९० रुपयांची विदेशी दारू, ७ लाख रुपयांची जीप आणि ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ८ लाख ७७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सो, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी केली.