कोल्हापूर ( प्रतिनिधी ):
गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी पुकारलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असून, उद्यापासून पुढील तीन दिवसांसाठी शेतीसाठीचा पाणीपुरवठा आणि उपसा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मा. खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही, राज्य सरकार आणि प्रशासनाकडून पाणी परिस्थितीबाबत चुकीचा अहवाल सादर करण्यात आला होता. या चुकीच्या माहितीच्या आधारे प्रशासनाने जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसाबंदीचे आदेश लागू केले होते. ऐन उन्हाळ्यात पाणी बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उभी पिके वाळू लागली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती.

