Sunday, July 19, 2026
HomePoliticalअजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया ! वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन...

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया ! वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

*अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया!*

कोल्हापूर, दि. १८:
महाराष्ट्रातील जनसामान्यांचे उमदे नेतृत्व दिवंगत अजितदादा पवार यांच्या अनेक आठवणी आपणा सर्वांच्या हृदयामध्ये आहेत. बुधवार दि. २२ जुलै रोजी येणाऱ्या त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून या आठवणी चिरंतन जतन करून ठेवूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस येत आहे. त्यानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करा, असेही इथे म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जनसेवा सप्ताहाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत श्री मुश्रीफ कोल्हापूरमध्ये बोलत होते.

भाषणात मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वच्छता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, शिस्तबद्धपणा हा त्यांचा अंगभूत स्थायीभावच होता. २२ जुलै हा अजित दादा पवार यांचा जन्मदिवस. परंतु या दिवशी त्यांची जयंती साजरी करावी लागेल, असे कधीही स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. या जनसेवा सप्ताहामध्ये आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छतेचा कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, प्रबोधनपर उपक्रम असे विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित करूया. संपूर्ण हयातभर अजितदादा पवार यांनी केलेले कार्य इतके महान होते की, शासनाने त्यांची जयंती करण्याचेही ठरविले आहे. विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून त्यांना आवडणाऱ्या लोकोपयोगी गोष्टी करूया.

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, दि. २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा यांची जयंती आणि त्याच दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे. या औचित्याने महाराष्ट्र सरकारकडून दि. तीन ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविले जाणार आहे. त्या-त्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारून प्रांतांच्यावतीने ते आयोजित केले जाणार आहे. या माध्यमातून त्या-त्या मतदारसंघातील लाभार्थ्यांना संबंधित सर्व लाभ द्यावयाचे आहेत.

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, दि. २२ जुलै रोजी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. तसेच; दि. २३ ते २५ या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधून स्तनांचा कॅन्सर, हाडांच्या मजबुतीची तपासणी, गर्भाशय मुखाचा मुखांचा कॅन्सर अशा अनेक विविध रोगांवरील चिकित्सा, औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत राबविल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉ. मुफज्जल लकडावाला यांचे हार्निया शस्त्रक्रिया शिबिर, तसेच स्थूलता निवारण शिबिर आयोजित केले जाईल. रक्तदात्यांची संख्या तर रेकॉर्ड ब्रेकच होईल.

एस.आर.आय. मोहिमेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री मुश्रीफ म्हणाले, ही मोहीम अतिशय गांभीर्याने घ्या. ही मतदार यादी निव्वळ आमदारकी आणि खासदारकीची आहे, असे समजून गाफील राहू नका. येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका, नगरपंचायती व महापालिका निवडणुकाही याच यादीवर होणार आहेत. या मोहिमेची मुदत निवडणूक आयोगाने दि. ८ ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे.

*पुणे पदवीधर अश्वमेधाचा घोडा…..!*
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात प्रताप उर्फ भय्या माने यांच्या रूपाने आपण अश्वमेधाचा घोडा सोडलेला आहे. आपण सर्वांनीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक लाखभर मतनोंदणी केलेली आहे. या नोंदणीमध्ये आपण नंबर एकवर तर आहोतच. अजूनही राहिलेल्या सर्वच मतदारांची नोंदणी कशी होईल, यासाठी जिद्दीने काम करूया.

*मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा…..!*
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याची तारीख दि. नऊ ऑगस्ट ही निश्चित होण्याची शक्यता आहे. या वेळी उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रावहीनी पवार आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनाही निमंत्रित करणार आहोत. या मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआर हॉस्पिटलच्या नूतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण, कागल नगरपालिकेने प्रतिष्ठापना केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन हे कार्यक्रम निश्चित केले आहेत.

*अजितदादांची अशीही आठवण…….!*
श्री. मुश्रीफ म्हणाले, अजितदादांना स्वच्छता प्रचंड आवडायची. अजितदादा स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच कमालीचे आग्रही असायचे. मी एकदा त्यांना स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेत राज्यस्तरीय आलेल्या जैन्याळ गावामध्ये येण्यासाठी आग्रह धरला. माझ्या आग्रहानुसार ते त्या गावात आले आणि गावात येताच त्यांनी जाऊन शौचालयांची स्वच्छता बघितली आणि समाधान व्यक्त केले. त्यामुळे ते वरकरणी स्वच्छता बघत नव्हते. झाडांच्यावर त्यांचे अतिशय मनापासून प्रेम होते. कार्यकर्त्यांना बळ आणि शक्ती देणारे ते एक हाडाचे लोकनेते होते.

यावेळी माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार राजेश पाटील, राहुल पी एन पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिल्पा खोत, शहराध्यक्ष आदिल फरास, इचलकरंजीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, गोकुळचे संचालक किसन चौगुले, बाळासाहेब खाडे, सतीश पाटील – गिजवणेकर, संभाजीराव पवार, अमरसिंह माने – पाटील, जिल्हा परिषद सदस्य क्रांतीसिंह पवार – पाटील, डॉ. जयंत पाटील, विद्याताई पाटील मानसी भोगन, भारत पाटील – भुयेकर, गोड साखरचे चेअरमन प्रकाशभाई पताडे, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, प्रकाशराव गाडेकर, शिवाजी देसाई, शिरीष देसाई, अभिषेक डोंगळे, जयसिंग चव्हाण, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, अमित गाताडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, प्रकाश मुगडे, परिक्षीत पन्हाळकर, आदी प्रमुख उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular