कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाविरोधातील कारवाईला करवीर पोलिसांनी आणखी वेग दिला असून, या प्रकरणात आणखी एका लॉजचालकाला अटक करण्यात आली आहे. करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अवैध वेश्याव्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचनेनुसार, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ११ जुलै २०२६ रोजी वाशी गाव हद्दीतील सनराईज लॉजिंगवर छापा टाकला होता. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली होती. तसेच लॉजवरील कर्मचारी व एजंट अशा तिघांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासादरम्यान आरोपी शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील (रा. हेदवडे, ता. भुदरगड) याने संबंधित महिलेला कोल्हापुरात आणून पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडी येथील स्वयंभू लॉजमध्ये ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. तेथे लॉजमालकासोबत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्राहक बोलावून कुंटणखाना चालविला जात असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी अमोल श्रीपती खोत (वय ४०, रा. मंगदेवी मंदिराजवळ, कणेरीवाडी, ता. करवीर) याला २० जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला २४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.