Sunday, August 9, 2026
HomeCrimeगर्भलिंग तपासणी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आरोपींकडून स्विफ्ट डिझायर, ॲक्टिव्हा जप्त

गर्भलिंग तपासणी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आरोपींकडून स्विफ्ट डिझायर, ॲक्टिव्हा जप्त

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी (PCPNDT) प्रकरणाच्या तपासात करवीर पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपी स्वप्नील केरबा पाटील आणि त्याचा एजंट संतोष ज्ञानदेव कोळी यांच्याकडून अनुक्रमे स्विफ्ट डिझायर आणि ॲक्टिव्हा या दोन वाहनांची जप्ती करण्यात आली आहे. यापूर्वी याच प्रकरणात आरोपींकडून वॅगनार कार देखील जप्त करण्यात आली होती.

या प्रकरणात करवीर पोलिसांनी यापूर्वी मुख्य फरार आरोपी स्वप्नील केरबा पाटील याला त्याचे एजंट संतोष ज्ञानदेव कोळी (रा. मडिलगे, ता. भुदरगड) आणि नंदकुमार भिमराव पाटील (रा. आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली) यांच्यासह अटक केली होती.

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्वप्नील पाटील हा कागल-मुरगूड मार्गावरील पिंपळगाव खुर्द येथे पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गर्भलिंग तपासणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले होते.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून सोनोस्कोप कंपनीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी आणि मोबाईल फोन असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

तपास पुढे नेत असताना पोलिसांनी आरोपींकडून गर्भलिंग तपासणीसाठी वापरल्या जात असल्याचा संशय असलेली वाहनेही जप्त केली आहेत. स्वप्नील पाटील याच्याकडून स्विफ्ट डिझायर, तर एजंट संतोष कोळी याच्याकडून ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी वॅगनार कार देखील ताब्यात घेतली होती.

या प्रकरणाच्या माध्यमातून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीच्या रॅकेटविरोधात करवीर पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून, या प्रकरणामागील आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच आरोपींकडून वापरण्यात आलेल्या वाहनांचा आणि इतर साधनांचा नेमका वापर कशासाठी करण्यात आला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीविरोधातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular