पन्हाळा प्रतिनिधी : शहानवाज मुजावर
यवलूज (ता. पन्हाळा) येथे गोठ्याच्या जागेवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्याने पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यशवंत कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन शमशेराव कोळी, दीपक शमशेराव कोळी आणि पूजा दीपक कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोठ्याच्या जागेवरून झालेल्या वादानंतर शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या मारहाणीत डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सचिन शमशेराव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय यशवंत कोळी, रोहित संजय कोळी आणि राणी संजय कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोठ्याच्या कारणावरून वाद घालून काठी, वीट व लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पन्हाळा पोलिस करीत आहेत.