Thursday, October 8, 2026
HomeUncategorizedराधानगरीतून महायुतीला धक्का ! किसन चौगले समविचारी आघाडीत

राधानगरीतून महायुतीला धक्का ! किसन चौगले समविचारी आघाडीत

कोल्हापूर:- गोकुळ वाचवण्यासाठी राधानगरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ला मोठा ताकदवान पाठिंबा मिळाला असून, गोकुळचे माजी संचालक किसन चौगले यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज राजर्षि शाहू समविचारी आघाडीत जाहीर प्रवेश केला. आमदार सतेज पाटील यांनी किसन चौगले यांची उमेदवारी जाहीर केली

गोकुळ दूध संघाच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून, राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट प्रमुख कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तसेच स्वाभिमान जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे उमेश भोईटे व गोकुळचे संचालक किसन चौगले यांनी स्पष्ट केले. या घडामोडीनंतर सतेज पाटील यांनी किसन चौगले यांची समविचारी आघाडीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

आमदार सतेज पाटील यांनी किसन चौगले यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजर्षी शाहू समविचारी आघाडीत प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. गोकुळची ही निवडणूक कोणत्याही एका पक्षाची किंवा व्यक्तीची नसून ही साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई आहे.

एखाद्या कार्यकर्त्यावरती अडचण निर्माण होते त्या काळात पाठीशी उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा योग्य सन्मान केला जाईल, त्यांच्यावर कधीही अन्याय होऊ दिला जाणार नाही. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी कडून किसन चौगले यांची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर करण्यात येत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले या गटाने दाखवलेली एकजूट कौतुकास्पद आहे. या गटाकडून किसन चौगले यांचा एकच अर्ज आला असल्याने गटाची ताकद किती आहे हे दिसून येते.निवडणुकीसाठी आता अवघे १० दिवस शिल्लक असल्याने आणि नवरात्राचा सण तोंडावर असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात आणि भागात राहून दूध उत्पादकांशी संपर्क साधावा, तसेच गोकुळवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचीच सत्ता आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना किसन चौगले म्हणाले राधानगरी तालुक्यात पक्षाकडून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. आम्ही १४ वर्षे पक्षाचे नेतृत्व केले असून आमचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवलेला नाही. गोकुळ दूध संघाचा टर्नओव्हर साडेचार हजार कोटींपर्यंत पोहोचवण्यात आणि शेतकऱ्यांचे भले करण्यात सतेज पाटील यांचे मोठे योगदान आहे. गोकुळ दूध संघ वाचवण्यासाठी आणि साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हितासाठीच आम्ही सर्वजण समविचारी आघाडीत प्रवेश करत आहोत असल्याचे गोकुळचे संचालक किसन चौगले यांनी सांगितले. यावेळी उमेश भोईटे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजेंद्र भाटळे, राजेंद्र पाटील सरवडे, विश्वास पाटील, नानासो पाटील, युवराज बर्गे, संतोष पाटील, भिकाजी एकल ,विनय पाटील ,पापा पाटील, दीपक किल्लेदार, सर्जेराव पाटील ,सुरेश चौगुले, विश्वास पाटील तारळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular