मुंबई : राज्य सरकारकडून गुरुवारी (ता. २ एप्रिल) प्रशासनात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले असून एकाचवेळी तब्बल २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
या बदल्यांमध्ये कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या शहरांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेतही बदल करण्यात आला असून डॉ. राजेंद्र भारूड यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान आयुक्त मंजू लक्ष्मी यांची बदली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
तसेच सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संजिता मोहापत्रा यांची नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, कोल्हापूरचे विद्यमान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेन यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रत्नागिरीच्या सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. जॅस्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषद सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यातील १० ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती, तर त्यांच्या जागी १९९३ बॅचचे अधिकारी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मोठ्या प्रशासकीय बदलांमुळे राज्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.