Sunday, May 24, 2026
HomeAdministrationपावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करा; वाहन चालकांची तीव्र मागणी

पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करा; वाहन चालकांची तीव्र मागणी

बालिंगा : मोहन कांबळे
कोल्हापूर – गगनबावडा मार्गे तळकोकण आणि गोवा दिशेने जाणाऱ्या महत्त्वाच्या राज्य महामार्गावरील खराब रस्त्यामुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. भोगावती नदीच्या पूर्वेकडील बालिंगा परिसरापासून वीज वितरण कार्यालयापर्यंत सुरू असलेले अपूर्ण रस्ते व मोरी बांधकाम पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी प्रवासी व वाहन चालकांतून होत आहे.
ब्रिटिशकालीन भोगावती नदीवरील पुलाला सुमारे १४० वर्षांचा इतिहास असून, पुलाची वयोमर्यादा संपल्याने येथे पर्यायी पूल आणि मोरीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामामुळे नदीच्या पूर्व बाजूस बालिंगा गावालगत वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आलेला पर्यायी रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि निसरडी परिस्थिती निर्माण झाल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हाळ्यात धूळ नियंत्रणासाठी रस्त्यावर पाणी मारण्यात येत असले तरी त्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी दुचाकी घसरून किरकोळ अपघातांच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यातच जुन्या मोरीचा संरक्षण कठडा कोसळलेल्या अवस्थेत असल्याने धोका अधिकच वाढला आहे.
भोगावती नदी ते महादेव मंदिर परिसरात रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्री वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे. नदीलगतचा उतार, सुरू असलेले नवीन मोरीचे बांधकाम आणि दुसऱ्या बाजूला संरक्षणभिंत नसलेली जुनी मोरी यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाजच येत नाही. कोल्हापूर – गगनबावडा हा तळकोकण व गोवा जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत एखादा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने संभाव्य धोका ओळखून तातडीने रस्त्याची दुरुस्ती, संरक्षण कठडे व प्रकाश व्यवस्था पूर्ण करावी, तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व कामे मार्गी लावून वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular