कोल्हापूर, प्रतिनिधी : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात करवीर तालुक्यातील कसबा आरळे गावातील दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेमुळे आरळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील भाविकांचा एक गट जेजुरी येथे देवदर्शनासाठी मिनीबसमधून रवाना झाला होता. पहाटे सुमारे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा येथील डी-मार्टजवळ त्यांच्या भरधाव मिनीबसने पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मिनीबसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात स्नेहल उत्तम कांबळे (वय १७) आणि एकनाथ बापू कांबळे (वय ६८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक निलेश तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर, हवालदार किशोर वायदंडे यांच्यासह स्थानिक शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना आणि मृतांना बाहेर काढण्यात आले.
आजोबा-नातीचा मृत्यू; गावात हळहळ
जेजुरीच्या देवदर्शनासाठी निघालेल्या आजोबा एकनाथ बापू कांबळे आणि त्यांची नात स्नेहल उत्तम कांबळे यांचा अपघातात मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्नेहल ही कसबा आरळे येथील पोलीस पाटील उत्तम कांबळे यांची कन्या असल्याने संपूर्ण गावात शोक व्यक्त केला जात आहे. गावातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.