Tuesday, June 30, 2026
HomeCrimeकरवीर पोलिसांची धडक कारवाई; गोवा बनावटीची ६३ हजारांची विदेशी दारू जप्त

करवीर पोलिसांची धडक कारवाई; गोवा बनावटीची ६३ हजारांची विदेशी दारू जप्त

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील मांढरे येथे अवैधरित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध करवीर पोलिसांनी कारवाई करत ६३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मांढरे येथे सर्जेराव जगताप हा बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.

गुन्हे शोध पथकाने मांढरे गावात जाऊन माहितीची खातरजमा केली असता विजय मारुती पोवार यांच्या जनावरांच्या गोठ्यात सर्जेराव जगताप हा गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गोठ्याजवळ सापळा रचून पाहणी केली असता एक व्यक्ती दारूच्या बॉक्ससह बसलेली दिसून आली. त्याच्याकडे ग्राहकांची ये-जा सुरू असल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून सर्जेराव सखाराम जगताप (वय ४०, रा. मांढरे, ता. करवीर) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ६३ हजार ८४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशीदरम्यान सर्जेराव जगताप याने विजय मारुती पोवार (वय ३९, रा. माळवाडी, मांढरे, ता. करवीर) याच्या साथीने दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय तळसकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सोमराज पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, रणजित पाटील आणि प्रकाश कांबळे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular