कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी उस शेतीसोबत दुय्यम पीक घेऊन आपली उपजीविका चालवतात. मात्र अलीकडे काही ठिकाणी खसखस या मसाल्याच्या पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे शेती करणारा बळीराजा प्रशासनाच्या कारवाईमुळे धास्तावल्याचे चित्र दिसत आहे.
घरगुती वापरासाठी विविध पदार्थांमध्ये मसाला म्हणून खसखशीचा वापर केला जातो. अलीकडे बाजारात या पदार्थाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे काही शेतकरी खर्च वाचवण्यासाठी किंवा दुय्यम उत्पन्न मिळवण्यासाठी खसखस पिकाची लागवड करत आहेत. मात्र प्रशासनाकडून या पिकाकडे संशयाने पाहिले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
विशेषतः करवीर तालुक्यातील काही गावांमध्ये पोलिसांकडून अचानक शेतांवर धाडी टाकून खसखस उत्पादक शेतकऱ्यांवर कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी असा आरोप केला आहे की कारवाईच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्यामुळे ते अधिकच गोंधळले आहेत.
“बळीराजा चोर नाही. काबाडकष्ट करून मसाल्याचे पीक म्हणून खसखस घेतली जाते,” असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी शेतकरी नेते व लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन प्रशासनाशी संवाद साधावा आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून द्यावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी उघडपणे गांजाची विक्री होत असल्याचेही आरोप होत आहेत. अशा बेकायदेशीर व्यवसायावर कठोर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिक शेतकऱ्यांवर कारवाई होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.