Thursday, April 16, 2026
HomeAdministrationपन्हाळा नगरपरिषदेस २.२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर

पन्हाळा नगरपरिषदेस २.२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर

पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर:

पन्हाळा येथील गिरिस्थान नगरपरिषदेला ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनामार्फत एकूण २ कोटी २५ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ (सन 2022-24) अंतर्गत १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपरिषद/नगरपंचायत गटात पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेला महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ अंतर्गत त्याच गटात पुणे विभागस्तरावर प्रथम क्रमांक व राज्यात चौथा क्रमांक मिळवून नगरपरिषदने यशाची परंपरा कायम राखली आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान सोहळा शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमास आचार्य देवव्रत (राज्यपाल) अध्यक्षस्थानी होते. तसेच राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री), पंकजा मुंडे (पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री), तसेच जयश्री भोज (सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) आदी मान्यवर उपस्थित होते.

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेला हा पुरस्कार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व सचिव जयश्री भोज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नगराध्यक्षा श्रीमती जयश्री पवार, उपनगराध्यक्ष श्री सतीश भोसले, अमितराज पवार तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी प्रिया तारळे व सुहास करळे यांनी मुंबई येथे उपस्थित राहून सन्मान स्वीकारला.

पन्हाळा नगरपरिषदेच्या या यशामुळे शहराच्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या कामगिरीला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular