Wednesday, April 15, 2026
HomeAdministrationदिवसा वीजपुरवठा व कृषी पंपांना मोफत वीज द्या; कळे येथे शेतकऱ्यांचे निवेदन

दिवसा वीजपुरवठा व कृषी पंपांना मोफत वीज द्या; कळे येथे शेतकऱ्यांचे निवेदन

कळे प्रतिनिधी:

“आपल्या राज्यघटनेने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे; मात्र तो शेतकऱ्यांना आजतागायत मिळालेला नाही,” असे प्रतिपादन रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिकराव शिंदे यांनी केले.

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू करावा तसेच साडेचार एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना मोफत वीज द्यावी, या मागण्यांसाठी कळे येथील महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

निवेदनात म्हटले आहे की, काटेभोगाव परिसरातील शेतकऱ्यांना वाळोली फिडरवरून सध्या रात्री वीजपुरवठा केला जात आहे. परिसरात बिबट्या, डुक्कर, साप, गवा आदी वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. तुटलेल्या विद्युत तारा अंधारात दिसत नसल्याने काही शेतकरी गंभीर जखमी झाले असून काहींना जीव गमवावा लागल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. माणिकराव शिंदे, तालुका अध्यक्ष बबन खाटांगळेकर, अरविंद पोवार, अमोल पोवार, कपिल शिंदे, रुपेश कांबळे, सागर वाळवेकर, दाजी वाळवेकर, विश्वनाथ पोवार, दिनकर चव्हाण, श्रीकांत पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील, अनिल मोळे, कुंभारवाडीचे सरपंच वरुटे यांच्यासह वारनुळ, काटेभोगाव, कुंभारवाडी, तळेवाडी, वाळवेकरवाडी, पानारवाडी आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी व कनिष्ठ अभियंता सोमेश खांडेकर यांनी निवेदन स्वीकारले.

दहा-बारा दिवस रात्री वीजपुरवठा; नंतर दिवसा देण्याची ग्वाही

उपकेंद्रावरील सध्याच्या ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त लोड सहन होणार नाही. ट्रान्सफॉर्मरला धोका निर्माण झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कंपनीने दहा-बारा दिवसांसाठी रात्री वीजपुरवठा करण्याची जबाबदारी घेतली असून काही दिवस शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागेल. त्यानंतर खात्रीने दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी (महावितरण, उपविभाग कार्यालय, कळे) यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular