राज्यातील महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना भारतीय जनता पक्षने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करत ‘टीम रविंद्र चव्हाण’ची अधिकृत घोषणा केली. या कार्यकारिणीत अनुभवी नेत्यांसोबतच अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने भाजप आगामी काळात संघटन विस्तारावर भर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नव्या कार्यकारिणीत व्यापक प्रतिनिधित्व
प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल कासेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्याय, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चेतन देशमुख, सुजय विखे पाटील आणि श्रीमती अर्चना चाकोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभाग, सामाजिक घटक आणि राजकीय अनुभव लक्षात घेऊन या नियुक्त्या करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
सरचिटणीसपदी सहा नेत्यांवर जबाबदारी
संघटनात्मक कामकाजाचा कणा मानल्या जाणाऱ्या सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, योगेश क्षिरसागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणुकांनंतर बूथस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे काम या टीमसमोर असणार आहे.
चिटणीसपदी नव्या चेहऱ्यांना संधी
चिटणीसपदी प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय, वर्षा ढहाळे, संजय जगताप, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनात्मक कार्यक्रम, संपर्क मोहिमा आणि पक्षाच्या उपक्रमांचे नियोजन या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या आघाड्यांवर नियुक्त्या
कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा, तर सहकोषाध्यक्षपदी लखानी यांची नियुक्ती झाली आहे. मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे काम त्यांच्याकडे असणार आहे.
युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली असून, युवा कार्यकर्त्यांना संघटित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली आहे. महिला मतदारांपर्यंत पक्षाचा प्रभाव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
आगामी राजकारणासाठी रणनीती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना भाजपने संघटनात्मक पातळीवर नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ व्यवस्थापन, नवमतदार संपर्क आणि सामाजिक माध्यमांवरील प्रचार यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची चर्चा आहे.
एकूणच, नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून भाजपने संघटन मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश दिला असून, ‘टीम रविंद्र चव्हाण’ राज्यातील राजकारणात कितपत प्रभाव पाडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.