कोल्हापूर:
सायबर महाविद्यालयात आयोजित विशेष समारंभात समाजकार्य क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. डॉ. दीपक भोसले यांना ‘विभूती पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. गेली तीस वर्षे समाजकार्य विभागात कार्यरत असलेल्या डॉ. भोसले यांनी विशेषतः तृतीयपंथी व वारांगना घटकांसोबत काम करत सामाजिक पुनर्वसन, सक्षमीकरण आणि विविध संस्थांच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष एस. महेंद्र देव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन डॉ. भोसले यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना देव यांनी सामाजिक जाणिवेतून प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देणे गरजेचे असून अशा कार्याची व्याप्ती अधिक वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन केले. तसेच अशा पुरस्कार सोहळ्यांमुळे कार्यकर्त्यांना नवी उर्मी व प्रोत्साहन मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन सायबर महाविद्यालयाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. आर. ए. शिंदे आणि सचिव सी.ए. ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
समारंभाला सायबर संस्थेचे संचालक डॉ. आर. के. टेलर, डॉ. व्ही. एम. हिलगे, डॉ. टी. व्ही. जी. सर्मा, शिवाजी विद्यापीठ येथील अर्थशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्रा. डॉ. ज्ञानदेव तलुळे, सायबर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, किर्लोस्कर कंपनीच्या सामाजिक बांधिलकी विभागाचे व्यवस्थापक शरद आजगेकर, श्री मोहन तायडे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभादरम्यान डॉ. दीपक भोसले यांना विभूती पुरस्कार प्रदान करतानाचे छायाचित्र उपस्थित मान्यवरांसह प्रदर्शित करण्यात आले.