कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावात शेतजमिनीच्या कारणावरून नातेवाईकांमध्ये वाद होऊन महिलेला शिवीगाळ, मारहाणीचा प्रयत्न व धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदाताई शिवाजी आरंडे (वय 45, रा. करंजफेन, ता. पन्हाळा) या व आरोपी हे नात्याने चुलत पुतणे लागतात. 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोरील उकीरड्यातील खत शेतात नेण्यासाठी ट्रॅक्टर उभा केला होता.
यावेळी आरोपी बजरंग आरंडे याने “घरासमोर ट्रॅक्टर लावू नका” असे सांगत वाद घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर फिर्यादी साहित्य आणण्यासाठी जात असताना आरोपी मानसिंग आरंडे याने तिचा हात धरून मागे ओढले व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर बजरंग, मानसिंग व तानाजी आरंडे हे काठ्या घेऊन फिर्यादी व त्यांच्या जाऊ शेवंता आरंडे यांच्यावर धावून आले. तसेच आरोपींच्या पत्नी मंगल, शांताबाई व रेखा आरंडे यांनीही शिवीगाळ केली.
घटनेदरम्यान गावातील यशवंत पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही हस्तक्षेप करू नका, अशी धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपींकडून वारंवार भांडण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7.16 वाजता भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेत लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आल्याचे नमूद आहे.
या घटनेचा पुढील तपास पन्हाळा पोलीस करत असून अधिक तपास सुरू आहे.