Saturday, September 12, 2026
HomeCrimeवाशी नाका फायरिंग प्रकरणातील अग्निशस्त्र पुरवठादार पोलिसांच्या ताब्यात

वाशी नाका फायरिंग प्रकरणातील अग्निशस्त्र पुरवठादार पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : वाशी नाका ते फुलेवाडी रिंगरोडवरील स्टार लोकल मार्केटजवळ १६ जुलै रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात अग्निशस्त्र व काडतुसे पुरविणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तावडे हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले. सतीश पवार (रा. जयसिंगपूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. प्राथमिक तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

१६ जुलै २०२६ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास वाशी नाका सिग्नल ते फुलेवाडी रिंगरोडदरम्यान स्टार लोकल मार्केटजवळ, शरयू अपार्टमेंटसमोर सुरज हणमंत साखरे (रा. कश्यप हाइट्स, नाळे कॉलनी, देवकर पाणंद, कोल्हापूर) हे कार्यालयातील सुरू असलेल्या कामाची पाहणी करून बाहेर आले होते. त्यावेळी दोन अनोळखी आरोपींनी त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्रातून गोळीबार केला. या हल्ल्यात साखरे गंभीर जखमी झाले होते.

या प्रकरणी अशुतोष अमित नाईक (वय २७, रा. छत्रपती शिवाजीनगर, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९५/२०२६ दाखल करण्यात आला. भा.न्या.सं. कलम १०९(१), ३(५), ६१(१), १११ तसेच भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ३, २५ व २७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास करताना आतापर्यंत सहा आरोपींसह गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार गणेश खाडे याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार, काडतुसे, वाहने आणि इतर मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

तपासादरम्यान आरोपी राकेश कारंडे याने जयसिंगपूर येथील त्याचा मित्र सतीश पवार याच्याकडून अग्निशस्त्रे आणि राऊंड घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर राकेश कारंडेकडून मिळालेल्या अग्निशस्त्राचा वापर करून आरोपी रफिक ऊर्फ देवा मुल्ला याने सुरज साखरे यांच्यावर गोळीबार केल्याचे तपासात समोर आले.

गुन्ह्यात अग्निशस्त्र आणि काडतुसे पुरविण्यात सतीश पवार याचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. गुन्हा घडल्यानंतर तो आपले अस्तित्व लपवून फिरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, सतीश पवार हा तावडे हॉटेल येथे येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून सतीश पवार याला ताब्यात घेतले. त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, संतोष बरगे, गजानन गुरव, सत्यजित सावंत, सत्यजित तानुगडे, संदीप सावंत, सागर चौगले आणि अरविंद पाटील यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular