कोल्हापूर / कसबा बावडा: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE), नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र-गोवा विभागाच्या वतीने यंदाचा “बेस्ट पॉलिटेक्निक” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गोव्यात आयोजित एका विशेष समारंभात पश्चिम बंगाल विद्यापीठाचे कुलगुरू सैकत मैत्रा आणि आय.एस.टी.ई.चे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार संस्थेचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, डॉ. पी. के. शिंदे, प्रा. अक्षय करपे व प्रा. सचिन पाटील यांनी स्वीकारला. या सोहळ्याला महाराष्ट्र-गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ. रणजीत सावंत आणि सेक्रेटरी के. पी. कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची दखल
डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये सातत्याने विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या संस्थेला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (MSBTE) कडून ‘एक्सलंट’ श्रेणी प्राप्त झाली आहे.
संस्थेतील अद्ययावत पायाभूत सुविधा, उत्कृष्ट निकाल, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यश, सामाजिक उपक्रम, उद्योग क्षेत्राशी केलेले सामंजस्य करार (MoUs), शिक्षकांसाठी संशोधनात्मक कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मिळालेले पेटंट्स, नव्याने सुरू केलेले स्टार्टअप्स, माजी विद्यार्थ्यांचे जागतिक नेटवर्क, ‘हिरकणी मंच’च्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी राबवलेले उपक्रम आणि दर्जेदार प्लेसमेंट्स या सर्व बहुआयामी कामगिरीची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
या यशामध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे, प्रा. सचिन पाटील यांच्यासह संपूर्ण स्टाफचे मोलाचे योगदान राहिले.