Thursday, April 16, 2026
HomeAdministrationजिल्ह्यात 655 ग्रामपंचायती क्षयमुक्त -जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्ह्यात टीबी मुक्त भारत अभियान-...

जिल्ह्यात 655 ग्रामपंचायती क्षयमुक्त -जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्ह्यात टीबी मुक्त भारत अभियान- १०० दिवसीय मोहीमेची सूरूवात

                                     

कोल्हापूर  : जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने क्षयरोग मुक्तीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे जिल्ह्यात ६५५ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या आहेत. यामध्ये ४२ ग्रामपंचायतींना सुवर्ण (गोल्ड), २२६ ग्रामपंचायतींना रौप्य (सिल्वर) तर ३८७ ग्रामपंचायतींना कांस्य (ब्राँझ) प्रमाणपत्र मिळाले असून, पुढील वर्षी यापेक्षा जास्त ग्रामपंचायती क्षयमुक्त करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केला आहे*. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात जागतिक क्षयरोग दिन व टीबी मुक्त भारत अभियान १०० दिवसीय मोहीमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या नॅट, एक्सरे आणि मायक्रोस्कोपी यांसारख्या निदान सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून संशयितांचे लवकरात लवकर निदान करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून मृत्यूदर कमी होईल. यावेळी निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना पोषण आहार कीट देणाऱ्या इंडोकाउंट फाउंडेशन, घाटगे पाटील इंडस्ट्रीज, विस्टा प्रोसेस्ड फूड्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, रेमंड लक्झरी कॉटन्स, लक्ष्मी पंप्स आणि जाणीव फाउंडेशन या संस्थांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जनभागीदारीचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.  

दुसरीकडे, सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते १०० दिवसीय मोहीमेचे अनावरण आणि धन्वंतरी व डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी क्षयमुक्त भारताची शपथ घेतली आणि जायन्ट्स ग्रुपतर्फे रुग्णांना पोषण कीट वाटप करण्यात आले. डॉ. दिलीप माने यांनी आपल्या भाषणात २०२५ च्या मोहिमेत केवळ लक्षणांवर अवलंबून न राहता जोखीमग्रस्त भागातील व्यक्तींची सक्रिय तपासणी करण्याचे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच १४ वर्षांवरील सर्व व्यक्तींची टीबी तपासणी आणि “निक्षय वाहना”द्वारे जनजागृती करण्यावर भर दिला.  

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. हर्षला वेदक यांनी २४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावल्याने या दिवसाचे महत्त्व विषद केले. तसेच सन २०२५ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांची नावे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये चंदगडने उत्कृष्ट क्षयरोग पथकात प्रथम क्रमांक मिळवला, तर इचलकरंजी आणि आजरा येथील रुग्णालयांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजरा तालुक्यातील भादवण केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला. विविध स्पर्धांमध्ये श्री. रत्नाकर कांबळे, डॉ. कोजागिरी देसाई आणि सौ. तनुजा कांबळे यांनी आपापल्या श्रेणीत प्रथम क्रमांक मिळवले. यासोबतच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आयुष्मान आरोग्य मंदिरांचाही उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव करण्यात आला.  

जिल्ह्यातील तालुकानिहाय क्षयमुक्त ग्रामपंचायतींच्या आकडेवारीनुसार, हातकणंगलेमध्ये ४८, कागलमध्ये ६४, राधानगरीत ७४, करवीरमध्ये ८४, पन्हाळ्यात ७९, शिरोळमध्ये ३१, गडहिंग्लजमध्ये ५२, गगनबावड्यात १६, चंदगडमध्ये ६०, शाहूवाडीत ५८, भुदरगडमध्ये ५२ आणि आजरा तालुक्यात ३७ अशा एकूण ६५५ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या आहेत. जिल्हयातील एकूण १०२५ ग्रामपंचायतींपैकी हे यश आरोग्य विभागाने मिळवले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी बर्गे यांनी केले तर डॉ. माधव ठाकूर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular