Friday, April 17, 2026
HomeCrimeनाशिक : अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण; जितेंद्र शेळके यांचा संशयास्पद अपघाती...

नाशिक : अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण; जितेंद्र शेळके यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू

नाशिक:

नाशिकमधील चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाला मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट मिळाला आहे. खरात यांचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांच्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना समृद्धी महामार्गावर शेळके यांच्या कारची ट्रकशी जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मात्र, या घटनेनंतर आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो, असा आरोप राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी असलेल्या व्यक्तीचा असा मृत्यू होणे अत्यंत संशयास्पद आहे. काही सत्य बाहेर येऊ नये म्हणून हा कट असू शकतो. तपास यंत्रणांची भूमिका देखील संशयास्पद वाटते,” असे त्या म्हणाल्या.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या घटनेवर शंका व्यक्त करत मोठी मागणी केली आहे. “जितेंद्र शेळके यांची काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी झाली होती. त्यानंतर लगेचच असा अपघात होणे संशयास्पद आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितांना संरक्षण द्यावे,” असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तृप्ती देसाई यांनीही या प्रकरणात मोठा कट असल्याचा आरोप केला आहे. “१७ मार्च रोजी खरातविरोधात गुन्हा दाखल झाला आणि आज १७ एप्रिलला शेळके यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर येणार होती. त्यामुळे साक्षीदारांना तातडीने संरक्षण द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, जितेंद्र शेळके यांचा मृत्यू हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात आहे, याबाबत तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणातील सत्य काय आहे, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular