कोल्हापूर : भारतीय हवामान विभागाने यावर्षी अल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याला प्राधान्याने पिण्याच्या वापरासाठी राखून ठेवण्याच्या उद्देशाने कोल्हापूर पाटबंधारे विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या आदेश क्रमांक एमआयएस/१०८२/८७, सिं.व्य.(म) दिनांक १० ऑगस्ट १९८४ तसेच महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून आणि शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.५०/२६/सिंव्य (धोरण) दि. १३ जून २०२६ मधील सूचनांनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या दोन्ही तीरावरील शेतीसाठी होणाऱ्या पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंता श्रीमती ज्योती देवकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी तसेच धामणी-जांभळी या नद्यांच्या दोन्ही काठावरील भागात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रांवर आज दि. १५ जून २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.
उपसाबंदी कालावधीत कोणत्याही प्रकारचा अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधित उपसा यंत्र जप्त करण्यात येणार असून संबंधित परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येणार असल्याचा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे. तसेच अशा कारवाईदरम्यान होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ५१(३) व ९७ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये जारी करण्यात आला आहे.