कोल्हापूर : प्रतिनिधी
वनस्पती तज्ञ व पर्यावरण अभ्यासक प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांच्या संघर्षमय व कार्यकर्तृत्वपूर्ण जीवनावर आधारित “निसर्गदूत – प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर — चोळेकर” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शाहूपुरी येथील शहाजी लॉ कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून होणाऱ्या या सोहळ्यात माजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ प्रा. डॉ. जय सामंत हे राहणार आहेत.
प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांचे पर्यावरण संरक्षणातील कार्य, वनौषधी संवर्धन, कास पठाराला जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न, तसेच विविध पर्यावरणविषयक लढ्यांमधील त्यांचे योगदान या पुस्तकातून अधोरेखित करण्यात आले आहे. इंडालसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीविरोधातील लढा, खाणकामाला विरोध, तसेच नव महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्प आणि शक्तिपीठ महामार्गास विरोध करत त्यांनी जैवविविधतेच्या रक्षणासाठी उभारलेले संघर्ष याचाही यात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
कार्यक्रमास प्राचार्य अभयकुमार साळुंखे, गुलाबराव पोळ, प्रा. डॉ. एस. आर. यादव, प्रा. डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. विश्वनाथ मगदूम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच गीतकार अमोल बुचडे यांचा पर्यावरण विषयक गीतांचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
असे प्रसिद्ध पत्रक डॉ. मधुकर येवलुजे, राहुल मगदूम, सुहास वायगंणकर, परितोष उरकुडे, डॉ. विदुला स्वामी, डॉ. मकरंद ऐतवडे, अभिजीत जाधव, जयश्री गंगाधरे, सुनील मुळे आदींनी दिले आहे